सांगली
सैराट सिनेमा येऊन आता काही वर्ष लोटली आहे. पण सैराट सिनेमात दाखवल्याप्रमाणे घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती काही थांबायचं नाव घेत नाही आहे. अजूनही राज्याच्या वेगवेगळ्या भागात सैराट सारख्या घटना घडतच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये धक्कादायक घडना घडली असून प्रेमविवाह केल्याचा रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीअसून याप्रकरणी आता दोघा संशयितांना ताब्यातही घेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तरुणाच्या नातलगांनी पोलिसांत या हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलंय.
याप्रकरणी आता अधिक तपास सांगली पोलिसांकडून केला जातो आहे.सांगलीच्या मिरजेतील सुभाष नगर बारगाले प्लॉट याठिकाणी प्रेम विवाह केल्याच्या रागातून योगेश चंद्रकांत लवाटे या २८ वर्षांच्या तरुणावर गुरुवारी हल्ला करण्यात आला.
अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरुन येत योगेशवर धारदार शस्त्रानं वार केले.
यानंतर दोघाही हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.यानंतर योगेशच्या मित्रांनी त्याला लगेचच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. म्हणून योगेशचा जीव थोडक्यात वाचलाय. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
दरम्यान, योगेशच्या काकीनं पोलिसांत या हल्ल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर दोघा संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.योगेश लवाटे याने दीड महिन्यांपूर्वी भडकंबे आष्टा येथील तरुणीशी प्रेम विवाह केला होता.
दोन दिवसांपूर्वी दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला होता. दोन्ही कुटुंबात झालेला वाद मिरज पोलिसांतही पोहचला होता. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच मुलीच्या वडिलांनी योगेश याला धमकी दिली होती.
यानंतर आता गुरुवारी योगेशवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सैराट सारखी घटना सांगलीत घडल्यानं चर्चांना उधाणही आलंय. एकूणच राज्यातील वाढत्या सैराट सारख्या घटनांची पुनरावृत्ती चिंतेचा विषय बनू लागली आहे.