पुरंदर हादरला !!!!                                तुझ्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे,तुला आज जिवंत सोडत नाही असे म्हणत सासवडमध्ये माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने केला प्राणहातक हल्ला

पुरंदर हादरला !!!! तुझ्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे,तुला आज जिवंत सोडत नाही असे म्हणत सासवडमध्ये माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने केला प्राणहातक हल्ला

पुरंदर

सासवड आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून अवैध धंद्याना विरोध करणा-या येथील माजी नगरसेवकावर कोयता गँगने हल्ला करून चारचाकींचे नुकसान केल्याची घटना रविवारी ( दि १२) रात्री १० च्या सुमारास घडली आहे. याबाबत सासवडचे माजी नगरसेवक गणेश बबनराव जगताप यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.


यातील सुरज उर्फ बिट्टू चंद्रकांत माने, ओंकार जाधव, सनी माने, अनिकेत जाधव, श्रीजय जाधव आणि अनोळखी दोघांवर गणेश जगताप यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सोमवारी ( दि १३ ) न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादीनुसार याबाबतचे वृत्त असे, रविवारी ( दि १२ ) रात्री १० च्या सुमारास फिर्यादी गणेश जगताप हे त्यांच्या आनंद प्लाझा येथील कार्यालयात बसले असताना त्यावेळी त्यांचा मुलगा प्रेम जगताप हा सोपाननगर येथून समर्थ बैठकीला जावून कार्यालयात आला व पाच ते सहा मुले एका चारचाकी गाडीतून माझा पाठलाग करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर प्रेम हा त्याच्याकडील दुचाकीने तर फिर्यादी गणेश जगताप यांच्याकडील चारचाकीने ( इंडीवर एम एच १२ आर के ०००५ ) तारादत्त पुर्व येथील अभिश्री गार्डन सोसायटी येथील घरी गेले. गणेश जगताप चारचाकी पार्क करीत असताना समोरून आलेल्या चारचाकीतून ( एम एच १२ जे यू ५३४४.) पाच ते सहा जण उतरून हातात धारदार कोयते, लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या दिशेने पळत आले. त्यामधे सुरज उर्फ बिट्टू चंद्रकांत माने, ओंकार जाधव, सनी माने, अनिकेत जाधव, श्रीजय जाधव यांच्या हातात कोयते होते. त्यापाठोपाठ एका दुचाकीवरून अनोळखी दोन मुले आली, त्यांच्या हातातही कोयते होते. त्यांनी सर्वांनी फिर्यादीवर हल्ला चढवला.

यावेळी फिर्यादी गणेश जगताप प्रसंगावधान दाखवत गाडीतच बसून राहिले. हल्लेखोरांनी फिर्यादीच्या गाडीच्या बोनेट, दरवाजे, दरवाजे व पुढील काचांवर कोयत्याने मारण्यास सुरूवात केली व आमच्या बिंगो मटक्याच्या धंद्याला आडवा येतो का… तुझ्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे., तुला आज जिवंत सोडत नाही असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून गाडीच्या डिकीमध्ये ठेवलेले पन्नास हजार रुपये काढून घेतले.

तसेच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीची पार्किंगमध्ये लावलेली दुसरी दुचाकी स्कार्पीओ फोडली. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर मुलगा प्रेम खाली पळत आला. याप्रसंगी फिर्यादीने जवळील परवानाधारक शस्त्र गाडीतून काढून हल्लेखोरांच्या अंगावर जात असल्याचे कळताच हल्लेखोरांनी पळ काढला. यातील आरोपी सुरज उर्फ बिट्टू माने हा विना परवाना रिव्हॉल्वर वापरत असून सासवडमध्ये कोयता गँग तयार करून दहशत करीत असल्याचेही फिर्यादी गणेश जगताप यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे पुढील तपास करीत आहेत.

याबाबत फिर्यादी माजी नगरसेवक गणेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदेगट व भाजपाचे सरकार आल्यानंतर पुरंदर तालुक्यात काही स्थानिक सत्ताधारी मंडळींनी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून सासवड आणि परिसरात मटका, जुगार, हातभट्टी आदींसारखे अनके अवैध धंदे झालू केले आहेत. स्थानिकांना या अवैध धंद्यामुळे त्रास होत असून तरूण पिढी बरबाद होत आहे. म्हणून एक सामाजिक भान सांभाळून मी व माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये जावून तोंडी व लेखी तक्रार केली असता आवाज उठविणा-यांना कायमचे संपविण्याचा प्रयत्न अशा अवैध धंदे करणा-यांकडून केला जात आहे. परंतू अशा मुजोरी आणि भ्याड हल्ल्याला न घाबरता सासवड व परीसरात कोणतेही अवैध धंदे चालू देणार नसल्याचे गणेश जगताप म्हणाले. तसेच वेळ पडल्यास हे सर्व अवैध धंदे बंद पाडण्यासाठी रास्ता रोको करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी पोलीस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रवृत्तींचा बिमोड करावा अन्यथा स्थानिक ग्रामस्थ कायदा हातात घेऊन अवैध धंदे बंद करतील असेही जगताप प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *