पुणे
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील ९१ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. एकूण २ हजार ८०० शेतकऱ्यांनी २ हजार ७०० एकर जागा देण्याबाबतची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत.त्यामुळे ही जागा ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुरंदर विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे. विमानतळाला होणाऱ्या विरोधामुळे सरकारने साडेसात हजारांऐवजी तीन हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता. तसेच, विमानतळासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरू केली. जागा देण्यासाठी शेतकऱ्यांना १८ सप्टेंबरपर्यंत संमतिपत्रे देण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी संपुष्टात आली.
भूसंपादनासाठी संमतिपत्रे देण्याच्या मुदतीमध्ये २ हजार ८०० शेतकऱ्यांनी २ हजार ७०० एकर जागा देण्याबाबतची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे.
या मुदतीमध्ये पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत २ हजार ८०० शेतकऱ्यांनी सुमारे २ हजार ७०० एकर जमीन देण्याची संमती दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. संयुक्त मोजणीनंतर शेतकऱ्यांच्या जमिनीचा दरनिवाडा निश्चित करून शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील सातही गावांंमध्ये सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे भूसंपादन केलेल्या जमिनीसह विमानतळासाठी सुमारे २९०० एकर जमीन उपलब्ध होणार आहे. दरम्यान, संमतिपत्रे देण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सहमतीने जमीन देणाऱ्यांस लाभ काय?
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सहमतीने जमिनी देणाऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ‘एरोसिटी’त एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी विमानतळाच्या परिसरात सुमारे सातशे एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार विमानतळासाठी सहमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना त्या मोबदल्यापोटी एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंड आणि बाजारभावाच्या चार पट दराने मोबदला देण्यात येणार आहे.
दोन धावपट्ट्यांचे नियोजन
पुरंदर विमानतळासाठी दोनच धावपट्ट्या करण्याचे नियोजन आहे. तसेच, विमानतळासाठी सुमारे २ हजार २०० एकर एवढे क्षेत्र असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.