पुरंदर पंचायत समिती शिक्षण विभागाचा अजब कारभार !!!!!! “या” जि.प. शाळेतील ६८ विद्यार्थ्यांना शिकवतेय एकच शिक्षीका

पुरंदर पंचायत समिती शिक्षण विभागाचा अजब कारभार !!!!!! “या” जि.प. शाळेतील ६८ विद्यार्थ्यांना शिकवतेय एकच शिक्षीका

पुरंदर

नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक मिळत नसल्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतच्या तब्बल ६८ विद्यार्थ्यांना एकाच शिक्षिकेला शिक्षण द्यावे लागत आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कोणीच वाली उरला नसल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने लहान मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे. ग्रामीण भागातील शाळा आता सुरु होत असताना अनेक शाळांमध्ये पटानुसार शिक्षकांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे पहिली ते चौथी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे.येथे एकूण ६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विद्यार्थीसंख्या चांगली आहे मात्र शाळेला शिक्षकांची संख्या कमी आहे.चार वर्ग व ६८ विद्यार्थी यांच्या साठी केवळ एकच शिक्षिका अध्यापन देत आहे.

अनेक वेळा मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामपंचायतीने अनेक वेळा जिल्हा परिषद,सीईओ, जि,प व पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी,केंद्र प्रमुख यांच्याकडे शाळेला शिक्षक मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

मात्र संबंधितांकडून दुर्लक्ष होत असून माझ्या हातात काहीच नाही, तात्पुरता तुमच्या पातळीवर स्वयंसेवक नेमा,मी काही तरी करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपणास निश्चित आश्वासन देऊ शकत नाही,२०१९ पासून संचमान्यता रखडलेल्या आहेत अशी उत्तरे मिळत आहेत.यामुळे ग्रामस्थांनी आता कडक पवित्रा घेतला असून आठवडाभरात शिक्षक रुजू न झाल्यास पालकांनी जिल्हापरिषदेच्या शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती माजी सरपंच हरिदास खेसे यांनी दिली आहे.

कोरोना कालावधी पूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

सुदैवाने आज ही परिस्थिती बदलून पुन्हा एकदा पालक जिल्हा परिषदेच्या शाळांवर विश्वास देऊ इच्छित असतानाही जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकांचे व्यवस्थापन न करता आल्याने पुन्हा पालक इंग्रजी माध्यमाकडे वळल्यास विशेष वाटू नये असे अनेक पालकांनी संजीवनी न्युजशी बोलताना सांगितले.

मागील महिन्यात त्या ठिकाणच्या एका शिक्षकाची सेवा निवृत्ती झालेली आहे.तदनंतर अंतर्गत व्यवस्थेनुसार त्या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक केलेली आहे.संच मान्यता झालेल्या नसल्यामुळे लगेच बदल्या करता येत नाहीत.येणाऱ्या काही दिवसामध्ये पदोन्नती होत आहे.यावेळी शिक्षक मिळून जाईल. : मोहन गायकवाड.गटशिक्षण अधिकारी पुरंदर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *