पुरंदर तालुक्यात रेशनिंग दुकानात चाललय तरी काय? आता “या” गावच्या स्वस्त धान्य रेशन दुकानाचा परवाना अखेर रद्द

पुरंदर तालुक्यात रेशनिंग दुकानात चाललय तरी काय? आता “या” गावच्या स्वस्त धान्य रेशन दुकानाचा परवाना अखेर रद्द

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी

सरकारमान्य स्वस्त धान्य रेशन दुकानासंदर्भात विविध तक्रारींची दखल घेत पुरंदर तालुक्यातील कोथळे गावच्या रेशन दुकानाचा परवाना अखेर कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. त्याबाबतचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी पारित केला आहे. यामुळे पुरंदर तालुक्यातील रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की कोथळे येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकान हे कल्याणी महिला बचत गट कोथळे यांना परवाना देऊन सुरू होते. कल्याणी महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचा भोंगळ गैरकारभाराबाबत कोथळे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष तुषार काकडे यांनी पुराव्यासह नोव्हेंबर २०२२ मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयांकडे तक्रारी अर्ज दाखल केले होते.

याची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशावरून पुरंदर तहसील कार्यालयाकडून महसूल नायब तहसीलदार पुरंदर आणि मंडल अधिकारी जेजुरी यांनी स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली असता आवश्यक असणाऱ्या आणि प्रत्यक्षात आढळलेल्या धान्य साठ्यातील गव्हात १०.३४ क्विंटलची तफावत तसेच तांदूळ मध्ये १२.१२ क्विंटलची तफावत असल्याचे आढळून आले होते.

अन्नसुरक्षा कार्डधारकांना दिलेल्या धान्याची माहिती दर्शवणारे स्वतंत्र रजिस्टर नसणे, धान्य साठा रजीस्टरला न नोंदवणे , अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेचे धान्य स्वतंत्र न ठेवणे , धन्यावाटपात तफावत असणे, फलकावर अद्यावत धन्यासाठ्याच्या नोंदी नसणे, शिधापत्रिकाधारकांना कमी जास्त प्रमाणात धान्य देणे, कार्डधारकांना पावती न देणे अश्या प्रकारचे मध्यम व गंभीर स्वरूपाचे दोष तपासणीत दिसून आले होते, त्यानुसार परवानाधारकाकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.

त्याच अनुषंगाने स्वस्त धान्य दुकान परवानाधारक कल्याणी महिला बचत गट कोथळे तर्फे अध्यक्षा यांनी तफावत असलेल्या सर्व धान्याची चालू बाजार भावाप्रमाणे रक्कम शासन जमा करावी व सदर स्वस्त धान्य रेशन दुकान परवान्याची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करून दुकानाचा परवाना कायस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा आदेश पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *