पुरंदर तालुक्यातील “या” गावात तीन महिन्यात गायरानात उभी राहिली पक्की घरे !!!!!                                                    नोटिसा देण्याचे फक्त नाटक; न्यायालयाच्या आदेशाचा अवमान?

पुरंदर तालुक्यातील “या” गावात तीन महिन्यात गायरानात उभी राहिली पक्की घरे !!!!! नोटिसा देण्याचे फक्त नाटक; न्यायालयाच्या आदेशाचा अवमान?

पुरंदर

उच्च व सर्वोच्च न्यायालयाने सरकारी गायरान जागेतील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर गुळुंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीने २०११ नंतरच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात येथील गायरान गट २ मध्ये पक्की घरे उभी राहिली असून वेळीच अतिक्रमण काढण्याची भूमिका न घेणाऱ्या ग्रामपंचायतीने आज अतिक्रमण धारकांची बैठक घेतली. सरपंच संतोष निगडे, ग्रामसेवक जयेंद्र सुळ यांनी यावेळी, “आम्ही तुमची अतिक्रमणे काढणार नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.वरून पत्र आलंय म्हणून देतोय नोटीस असा दिलासा देत गायरान जागेतील अतिक्रमणांना पाठीशी घातले.सरपंच संतोष निगडे म्हणाले, “नोटीसवर माझी सही आहे का बघा ? सही नाही. मग घाबरू नका…” त्यामुळे अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देणारे हेच व घाबरू नका अतिक्रमण काढणार नाही असे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारे हेच अशी चर्चा गावात दिवसभर सुरू होती.

विद्यमान ग्रामपंचायत सत्तेत आल्यावर गायरान जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने अनेक एकर जागा हडप झाली आहे. लोकांनी गायरान जागा बळकावली असून मोठी, पक्की घरे बांधली आहेत. मात्र, सरकारी जागा गिळंकृत केली जात असताना ग्रामपंचायतीमार्फत अतिक्रमण काढण्यात आले नाही. गेल्या तीन महिन्यात देऊळवाले समाजातील अनेकांनी गायरान जागेत पक्की घरे बांधली आहेत. सरपंच संतोष निगडे यांच्या कार्यकाळात सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आले असल्याने त्यांच्यावर न्यायालयाने कार्यवाही करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते आता न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

दरम्यान, गायरान जागेतील अतिक्रमण काढावे असे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. असे असतानाही ग्रामपंचायतीने अतिक्रमण न काढण्याचा बेकायदेशीर ठराव केला असून न्यायालयीन प्रलंबित बाबीवर ठराव घेण्याचा कोणताही अधिकार ग्रामपंचायती ला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात हें पाऊल असल्याने जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी लोक करत आहेत.

“ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यास वेळोवेळी कसूर केल्याने आजवर अतिक्रमणे वाढली. आता तर नोटीस यांनीच दिली असून,” घाबरू नका, अतिक्रमण काढणार नाही.” असे म्हणणारे हेच आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याने ही बाब संबंधित न्यायमूर्तींच्या निदर्शनाला आणून देणार असून अवमान याचिका दाखल करणार आहे.” – अक्षय निगडे, युवक उपाध्यक्ष, पुणे जिल्हा.

गुळुंचे ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असून नोटिसा दिल्याने लोक घाबरत आहेत. आपल्या मताची पोळी भाजण्यासाठी अशा नोटिसा दिलेल्या लोकांना बोलावले जात असून घाबरू नका, आम्ही बरोबर आहोत. तुमच्या घरांना काहीही होणार नाही. आमच्यावर लक्ष ठेवा. अशी गळ घातली जात आहे. जात, पात, पैसा आणि आता भीतीचे राजकारण सुरू असल्याचे मत नितीन निगडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *