पुणे
पुरंदर तालुक्यातील कोथळे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत सुभाष जगताप यांना महाराष्ट्र राज्य आदर्श तंटामुक्ती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.यावर्षीचा हा सोहळा शिर्डी (जि. अहमदनगर) येथे पार पडला.
या कार्यक्रमाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, महाकाल संस्थान उज्जैनचे महंत श्रीकांत धुमाळ, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार, सचिव बाळासाहेब पावसे, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सूर्यकांत जगताप यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या एका वर्षभरात सूर्यकांत जगताप यांनी गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तंटे होऊ नयेत यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली. गावाच्या विकासात आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. 40 वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक तंटे त्यांनी यशस्वीपणे मार्गी लावले. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही विविध संस्था व संघटनांनी त्यांना पुरस्कारांनी गौरविले आहे.
यामध्ये माऊली बाल संस्कार शिबीर सासवड यांच्याकडून आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष पुरस्कार, अहिल्या आदर्श रत्न पुरस्कार, मार्तंड वारकरी संस्था जेजुरी यांच्याकडून आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष पुरस्कार, तसेच प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे जिल्हा यांच्याकडून तालुकास्तरीय आदर्श तंटामुक्ती गाव आणि आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष (प्रथम क्रमांक) पुरस्कार अशा मानांकित गौरवांचा समावेश आहे.
कोथळे गावाच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय तंटामुक्ती पुरस्कार मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. या पुरस्काराबद्दल विद्यमान सरपंच जयश्री भोईटे यांनी सूर्यकांत जगताप यांचे अभिनंदन केले. तसेच कोथळे पंचक्रोशीसह संपूर्ण पुरंदर तालुका व पुणे जिल्ह्यातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.