पुणे
पुरंदर तालुक्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे रिक्षा विहरीत पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे मृतांमध्ये दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दांम्पत्याचाही समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील धायरीहून जेजुरीच्या खंडोबाच्या देवदर्शनाला निघालेली रिक्षा विहिरीत पडल्याने एका तरुणीसह नवदांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे हा दुर्देवी अपघात घडला.
व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती तात्काळ सासवड पोलिसांना देवून रिक्षासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे. संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच असा दुर्देवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.