पुरंदर तालुक्यातील बनावट दाखले देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन व्हावे ; अन्यथा प्रहार अपंग क्रांती आंदोलन करणार – सुरेखा ढवळे

पुरंदर तालुक्यातील बनावट दाखले देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन व्हावे ; अन्यथा प्रहार अपंग क्रांती आंदोलन करणार – सुरेखा ढवळे

पुरंदर

पुरंदर तालुक्यात शिक्षक बदल्या संवर्ग १ व संवर्ग २ शिक्षकांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करणाऱ्या समितीमध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या ऐवजी प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पडताळणी समितीमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अनिल गायकवाड यांनी संदीप लव्हे, संतोष बोरकर,योगेश बनकर या प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.सदर पडताळणी करताना अनेक बदली पात्र शिक्षकांनी दिशाभूल करणारी व खोटी प्रमाणपत्रे सादर केली. तसेच शिक्षकांना बदली प्राप्त व्हावे यासाठी संबंधितांनी मार्गदर्शन केल्याचा आरोप अपंग प्रहार क्रांती आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

बदली पात्र शिक्षकांच्या पडताळणी समिती मध्ये नेमणूक केलेल्या संदीप लव्हे यांनी त्यांच्या चिकणेवाडी शाळेत पाच पेक्षा कमी पट असूनही दोन शिक्षक मान्य करुन घेतले आहेत.तर संतोष बोरकर यांनी पतीपत्नी एकत्रीकरणासाठी सर्वात जवळचे अंतर २२ कि.मी. असतानाही दूरच्या मार्गे सदर अंतर वाढवून ३० किमी दाखवले आहे.सक्षम अधिकारी म्हणून बांधकाम अभियंत्यांचा दिशाभूल करुन खोटा दाखला मिळवला आहे.

सन २०१८ नंतरच्या दिव्यांगांची मेडिकल बोर्डासमोर तपासणी करुन ऑनलाईन प्रमाणपत्रा शिवाय संबंधित शिक्षकांना बदली प्रक्रियेचा लाभ देवू नये.अशा शासनाच्या सक्त सूचना असताना देखील पुरंदर मधील शिक्षकांकडून केवळ शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र भरून घेत बदली प्रक्रियेमध्ये लाभ देण्यात आला.

“या संदर्भात यापूर्वी निवेदन देवून देखील तालुका प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पडताळणी समितीतील शिक्षकांसह,दोषी शिक्षक व गटशिक्षणाधिकारी यांचे निलंबन व्हावे. व जिल्हा प्रशासनाने बनावट दाखले देणाऱ्या शिक्षकांना
बदली मध्ये सुट देवू नये.” – सुरेखा ढवळे,
प्रदेशाध्यक्ष,
प्रहार अपंग क्रांती आंदोलन

मात्र पुणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यात शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र भरुन दिव्यांग शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये सूट देण्यात आलेली नाही.पतीपत्नी एकत्रीकरण अंतरासाठी सर्वात जवळच्या मार्गाचा विचार करावा असा स्पष्ट शासन आदेश असताना देखील अनेक शिक्षकांनी जाणिवपूर्वक दूरचे अंतर ग्राह्य धरुन तसे दाखले मिळवले आहेत.सदर दाखले व अंतराची खात्री तालुकास्तरीय पडताळणी समितीने करणे आवश्यक होते. सदर शिक्षकांच्या अंतराबाबत आक्षेप असून त्यांची तपासणी झाल्याशिवाय प्रक्रिया सुरू करू नये असे यापूर्वी संघटनेमार्फत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला त्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही.

तर सदर शिक्षकांची माहिती बरोबर असल्याचे दाखवत प्रशासन मेहरबान झाले आहे.
त्यामुळे जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारे माहिती भरुन घेत बदली प्रक्रिया प्रभावीत केलेल्या संबंधित दोषी शिक्षकांचे निलंबन करुन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी.असा शासन आदेश असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक सदर बाबींकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे.

शासन निर्णयाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास पुरंदर पंचायत समितीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी अमर माने यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *