पुरंदर
जिल्हा अंतर्गत सन २०२२-२३ मधील संगणकीय प्रणाली द्वारे बदल्या झालेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील १५ मे २०२३ रोजीच्या आदेशानुसार कार्यमुक्त करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इतर तालुक्यातून बदलीने पुरंदर तालुक्यात हजर होत आहेत.
मात्र पुरंदर तालुक्यातून बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रवास कालावधी व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होऊन पर तालुक्यातील शिक्षकांना वेळेत बदली ठिकाणी हजर व्हावयाचे आहे. त्यासाठी पुरंदर तालुक्यातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्याबाबत आदेश व्हावेत. अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने पुरंदरचे गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गटविकास अधिकारी अमर माने यांची भेट न झाल्याने शिष्टमंडळाने पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्याशी चर्चा केली.
बदल्यांची फाईल यापूर्वीच गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवलेली आहे. असे गटशिक्षणाधिकारी गवळी यांनी सांगितले.
तसेच पुरंदर पंचायत समिती येथे महागाई भत्ता फरकाची थकबाकी बिले अद्याप पर्यंत शिक्षकांना मिळालेली नाहीत. महागाई भत्ता फरकाची थकबाकी बिले त्वरीत मंजूर होणे बाबत शासन आदेश झाले असून सदरची देयके आवश्यक पूर्तता करून गटविकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांचेकडे सादर करण्यात आलेली आहेत. पंचायत समिती अंतर्गत इतर कर्मचाऱ्यांना सदरची बिले दोन महिन्यापूर्वीच मिळालेली आहेत.
मात्र सदरची बिले शिक्षकांना मिळण्यास विलंब होत आहे. पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शिक्षकांना सदरची बिले यापूर्वीच अदा करण्यात आलेले आहेत.
मात्र पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सदरची महागाई भत्ता थकबाकी बिले मिळालेली नाहीत.
यामध्ये कार्यालयीन कर्मचारी उदासीन असल्याने शिक्षकांना सदरची बिले मिळण्यास विलंब होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.ती त्वरित मंजूर करुन शिक्षकांना मिळावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते महादेव माळवदकर पाटील, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनीलतात्या कुंजीर, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, कार्याध्यक्ष सुनील जगताप, शिक्षक नेते तथा पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मा.चेअरमन यशवंतराव दगडे, पुणे जिल्हा शिक्षक समिती पतसंस्थेचे चेअरमन मनोज दिक्षित, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक मनोज सटाले,पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव कामथे,शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस नंदकुमार चव्हाण उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी पुरंदर तालुका शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. व यापुढेही प्रयत्नशील राहील असे आश्वासन यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले.