पुरंदर उपसा शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर;शिवतारेंची जंगी मिरवणूक काढून केला सत्कार

पुरंदर उपसा शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर;शिवतारेंची जंगी मिरवणूक काढून केला सत्कार

   पूर्व पुरंदर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात आनंदाची लहर निर्माण झाली असून पुन्हा एकदा १९ टक्के दराने पाणी मिळण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान पूर्व भागातील आंबोडी, वनपुरी, उदाचीवाडी, गुरोळी,सिंगापूर, वाघापूर, टेकवडी, माळशिरस, राजेवाडी, बेलसर, पिसर्वे, मावडी, पिंपरी, भोसलेवाडी, दिवे, जाधववाडी, काळेवाडी, पवारवाडी, राजुरी, रीसे पिसे आदी गावातील शेतकऱ्यांनी आज वाघापूर चौफुल्यापासून पंप हाऊसपर्यंत माजी मंत्री विजय शिवतारे यांची जंगी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. श्री. शिवतारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठकही यावेळी पार पडली. शिवतारे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार या प्रसंगी करण्यात आला. 

  यावेळी शिवतारे म्हणाले, मी राज्यमंत्री असताना पुरंदर उपसा योजनेचे पाणी १९ टक्के दरात द्यायला सुरवात केली. मात्र २०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार आले आणि वीजदर वाढवून तो तिप्पट करण्यात आला. त्यामुळे आपोआप पाण्याचा दरही गगनाला भिडला. राज्यात सत्ताबदल झाल्यावर मुख्यमंत्र्यांना मी पालखीतळावर हा दर कमी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ती तत्काळ मान्य करत २५ ऑगस्ट रोजी वीजदरात कपात करण्याचा आदेश काढला. त्यानंतर तब्बल ५ महिने मी जलसंपदा विभाग आणि कृष्णा खोरे महामंडळाकडे पाठपुरावा करून पाण्याचा दर कमी करून घेतला. आता यापुढे हा दर १८९२४ रुपये असेल आणि सर्व हंगामात तो एकसारखा असेल. विद्यमान आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना वारंवार विनंती करूनही पुरंदरच्या शेतकऱ्यांची दयामाया कुणाला आली नाही. पण आता मात्र सगळ्यांची श्रेयासाठी धांदल उडाली आहे. तीन वर्षात सरकार असताना जे लोक काहीच करू शकले नाहीत ते आता लोकांची दिशाभूल करीत आहेत. पण यांची पात्रता लोकांना आता समजली आहे. 

 कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी ॲड नितीन कुंजीर, गणप्रमुख धीरज जगताप यांनीही तुफान बॅटिंग करत आमदार खासदारांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.

शिवतारे यांनी हा निर्णय काल जाहीर केला आणि आज या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली. फटाक्यांची आतषबाजी, डिजेचा दणदणाट आणि घोषणाबाजीने सबंध परिसर दणाणून गेला होता. गंमत म्हणजे “अनाथांचा नाथ” या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित गाण्यावर शेतकरी थिरकताना अनेक शेतकरी पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *