पुणे
पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४ टीएमसी पाणी सिंचनासाठी उचलण्यास परवानगी आहे. परंतु जलसंपदा विभाग योजना कार्यान्वित झाल्यापासून २ टीएमसी पेक्षा अधिक पाणी उचलू शकेलला नाही. ही बाब लक्षात घेऊन तांत्रिक दोष आणि जास्तीत जास्त जलवाहिन्याचे जाळे निर्माण करावे. त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून आणू असे प्रतिपादन आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे. सिंचन भवन येथे श्री. शिवतारे यांच्या उपस्थितीत पुरंदर उपसा योजना, कऱ्हा नीरा नदीजोड प्रकल्प व अन्य विषयांवर बैठक पार पडली.
बैठकीला शिवतारे यांच्यासह मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता श्री. जैस्वाल, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, राजेंद्र दुबल यांच्यासह शिवसेनेचे पुरंदर तालुकाप्रमुख हरीभाऊ लोळे, उदाचीवाडी येथील सरपंच श्री. तात्या मगर, अविनाश बडदे, विशाल लवांडे, विक्रांत पवार, दिपक काळे, उमेश काळे, सागर यादव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या कऱ्हा नीरा नदीजोड प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. त्यात शिवतारे यांनी काही दुरुस्त्या प्रस्तावित केल्या. याशिवाय पुरंदर उपसा योजनेचे पंप कचरा, जलपर्णी आणि प्लास्टिक यामुळे मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहून घ्यावे अशा सूचना शिवतारे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या मेंटेनन्सचे काम करणारी यंत्रणा अत्यंत दर्जाहीन आणि संथ असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करावी असेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित मान्यता प्रस्ताव आणि निधी उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही करावी असेही शिवतारे यांनी यावेळी सुचित केले. पुरंदर उपसा योजनेचे तलाव जोडण्यासाठी यंदा अतिरिक्त ३० कोटींचा निधी मिळणार असून पूर्व भागातील राजुरी, रिसे , पिसे, नायगाव आणि पांडेश्वर या गावांनाही पुरंदर उपसाचा नियमित लाभ मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करावी असे शिवतारे यावेळी म्हणाले.