पुणे
पुण्यात एक धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. प्रेमीयुगुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. परंतु, प्रेम आंधळं असल्यामुळं प्रेमात पडताना पुढं धोका आहे, याचं भानही काहींना राहत नाही. पुण्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एक तरुणीने प्रेमावर विश्वास ठेवून एका तरुणाला आयुष्यभर साथ देण्याचा वचनही दिले.
पंरतु त्या तरुणाने तरुणीच्या भावनांचा खेळ करुन तिच्याच नावावर २५ लाख रुपयांचे कर्ज काढले आणि दुसऱ्या तरुणीशी विवाह केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शांतनु बाळासाहेब महाजन (२८) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शांतनु बाळासाहेब महाजन (रा.न्याती इलेशिया, थिटेनगर, खराडी) या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे एमसीए झाले आहे. तर आरोपी तरुणाने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. दोघांनीही लग्नासाठी एका लग्न नोंदणी संबंधी संकेतस्थळावर त्यांच्या नावाची नोंदणी केली होती.
त्यानंतर शांतनुने फिर्यादी तरुणीचा संपर्क क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री केली. तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी शारिरीक संबंधही ठेवले. तरुणाने पीडित तरुणीच्या मोबाईलवर तिच्याच नावाने विविध प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड केले. त्याद्वारे त्याने बॅंकेतून वेळोवेळी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले.
ते पैसे खर्चही केले.त्यानंतर त्याने पीडित तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. तरुणाने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न करुन नवा संसारही थाटला. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली.