पुणे
जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी आणि अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अभियान संपल्यानंतर ग्रामपंचायतींना बक्षीस दिलं जाणार आहे.
पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं 25 लाख आणि तिसरं बक्षीस 15 लाखाचं देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
मागील दोन वर्षांपासून आपण कोविड संकटाशी मुकाबला करीत आहोत. हे मानवजातीवर आलेले संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल. नागरिकांनाही या आजाराबाबत गांभीर्य लक्षात आले आहे. दोन वर्षात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे.
हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत
‘बिजेएस’च्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.