पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना !           “या” महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहनाने १७ महिलांना उडवलं; धडक इतकी भिषण, तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या

पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना ! “या” महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहनाने १७ महिलांना उडवलं; धडक इतकी भिषण, तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या

पुणे

पुण्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन ते तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १४ महिला जखमी झाल्या आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. 

दरम्यान, पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ महिला गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाला. अजूनही १४ महिलांवर उपचार सुरू असून यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मध्यारात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा ओरडा झाला. रस्त्यावर रक्ताची थारोळी साचली. अपघातग्रस्त महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने १७ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *