पुणे
दौंड तालुक्यातील राजेगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले. विशेष म्हणजे, तहकूब ग्रामसभेमध्ये जमा-खर्चाचा हिशेब विचारला असता सरपंच आणि ग्रामसेवकाने माहिती देण्याऐवजी सभेतून पळ काढल्याने हा प्रकार घडला.जोपर्यंत त्यांना २०२३ ते २०२५ या कालावधीतील संपूर्ण जमा-खर्चाची माहिती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडले जाणार नाही, असा इशारा संतापलेल्या नागरिकांनी देऊन लेखी निवेदन देऊन मागणी केली.माहिती न दिल्याने नागरिक संतप्त राजेगाव ग्रामपंचायतीत नुकतीच तहकूब ग्रामसभा घेण्यात आली.
या सभेपूर्वी नागरिकांनी लेखी अर्ज करून २०२३ ते २०२५ या कालावधीतील ग्रामपंचायतीच्या संपूर्ण जमा-खर्चाचा हिशेब आणि माहिती लेखी स्वरूपात मागितली होती. ग्रामसभेत ही माहिती समोर यावी आणि खर्चावर चर्चा व्हावी, हा उद्देश होता. जेव्हा नागरिकांनी ग्रामसभेत माहिती देण्याची मागणी केली, तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही.
प्रशासनाने माहिती देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.निवेदनावर गटनेते मुकेश गुणवरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शहाजी गुणवरे, मनोज भोसले, राजेश राऊत, दत्ताजी मोघे, महेश कडू, संजय मेंगावडे आदींसह अनेक नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना तातडीने माहिती उपलब्ध करून दिली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
माहिती न मिळाल्याने नागरिक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा वाढता संताप आणि प्रश्नांची सरबत्ती पाहून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी चालू ग्रामसभेतूनच चक्क पळ काढला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांचा संताप अधिकच भडकला. लोकशाही पद्धतीने चाललेल्या सभेत, हिशेब देण्याऐवजी पळून जाणे, हे चुकीचे असल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला.
“राजकीय हव्यसपोटी केलेला आरोप आहे. ग्रामपंचायत कडून केलेल्या सर्व कामांचे टेंडर ऑनलाईन होतात आणि रक्कम त्या ठेकेदार यांच्या खात्यात जाते सर्व कामावर पंचायत समितीतील अधिकरी त्यांची पाहणी असते त्यामुळे कामात कामचुकार पणा होता नाही. जी माहिती पाहिजे ती सर्व माहिती माहिती अधीकरातून मिळते.”
– ललिता सोपान चोपडे, प्रभारी सरपंच.

