पुणे
पारगाव ता. आंबेगाव येथील यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल चंद्रकांत ढोबळे व लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे या दीर भावजयीने एकूण १५ एकर क्षेत्रात फ्लॉवरचे पिक घेतले असुन पहिल्या तोड्यातच दोन एकरातून ४५० पिशवी फ्लावर उत्पादन घेतले आहे.
प्रती १० किलोस २३० रुपयाचा बाजारभाव मिळाल्याने पहिल्याच तोड्याला सव्वा पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले. अजुन उर्वरित १३ एकर क्षेत्रातून २५०० ते २७०० पिशवी उत्पादन अपेक्षित असून असाच बाजारभाव टिकून राहिल्यास सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळु शकते.
अनिल ढोबळे व श्वेता ढोबळे हे दीर भावजय सामाजिक कामाबरोबर शेतीही चांगल्या पद्धतीने पाहतात. त्यांनी एकूण १५ एकर क्षेत्रात गादि वाफे करून पाण्यासाठी ठिबक बसवुन जुलैच्या पहिला आठवड्यात फ्लॉवरच्या रोपांची लागवड केली.
एका एकरसाठी त्यांना १७ हजार रोपे लागली. एक रोप त्यांना एक रुपयाला बसले. लागवडीपूर्वी प्रती एकरी तीन ट्रॅक्टर ट्रॉली कोंबड खत टाकले. लागवडीनंतर कृषी तज्ञ नानाभाऊ ढोबळे व सुनील दाते यांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक खतांचा डोस दिला. आवश्यकतेनुसार कीटक नाशक औषधांची फवारणी केली. प्रती एकरी ५० हजार रुपये उत्पादन खर्च आला.
लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी फ्लावर काढणीला आली. पहिल्या दोन एकरात ४५० पिशवी उत्पादन निघाले एक पिशवीचे वजन ५० किलो भरते. निलेश शिंदे व भाऊसाहेब माडीवाले या व्यापाऱ्यांनी शेतात जागेवरच प्रती १० किलोला २३० रुपये दराने फ्लॉवरची खरेदी केली संपूर्ण २० टन वजनाचा ट्रक शेतातच फ्लॉवरच्या पिशव्यांनी पूर्ण भरला.
अनिल ढोबळे यांचे भाऊ सुरेश चंद्रकांत ढोबळे व किरण चंद्रकांत ढोबळे यांचेही वेळोवेळी मदत होत असते पहिल्या दोन एकरातच पहिल्या तोड्यालाच सव्वा पाच लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. असाच बाजारभाव टिकून राहिल्यास उर्वरित क्षेत्रातून सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळु शकते असा विश्वास अनिल ढोबळे यांनी व्यक्त केला आहे.
लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे या गावच्या सरपंच असून शेतातील सर्व कामे उत्तम पद्धतीने करतात वेळप्रसंगी ड्रायव्हर नसेल तर स्वता: ट्रॅक्टर चालवतात. त्यांच्या शेतात १५ जणांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे.