पुणे
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींमार्फत निधी दिला जात असतो. मात्र अनेक ठिकाणी या निधीत अपहार झाल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार आंबेगाव तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत समोर आला आहे.यात वरसावणे गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इमारतीला पाण्याची गळती लागली असुन या कामाची ठेकेदार असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीनेच गावच्या शाळेला चुना लावल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या वरसावणे या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. माजी मंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या मतदार संघातील आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील वरसावणे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सर्व शिक्षा अभियानातुन ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी दोन टप्प्यात मंजुर झाले होते. शाळेचे काम करण्यासाठी ठेकेदार नेमताना ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला.
शाळेचे काम स्वतः ग्रामपंचायतीने घेऊन सबठेकेदार नेमला. यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शाळेच्या छताला पावसात गळती लागली. यामध्ये छत, खिडकी, भिंती आणि ध्वजाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरुन शाळेत शिक्षण घेत असताना दिसून येत आहेत.
आता पालकांनी मुलांची व्यवस्था अंगणवाडीत करत ग्रामपंचातीनेच गावच्या शाळेला चुना लावल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.आंबेगाव तालुक्यातील बोरघर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात शाळेची अवस्था दैयनीय झाल्याने आमची जुनीच शाळा बरी होती; अशी म्हणण्याची वेळ पालकांसह ग्रामस्थांवर आली आहे. मात्र विकास कामांच्या वलघणा करणारे नेते पुढारी मंडळी या शाळेच्या दुरावस्थेकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे.