पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!! “या” गावात “पंचायत समिती” माजी “सदस्य” आणि माजी “सरपंच” यांच्यात झाली हाणामारी

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!! “या” गावात “पंचायत समिती” माजी “सदस्य” आणि माजी “सरपंच” यांच्यात झाली हाणामारी

पुणे

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले आणि माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी मंगळवारी (दि.11) दुपारी झाली, परंतु उपस्थित कार्यकर्त्यांनी दोघांनाही बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह घोषित केले. त्यानुसार आंबेगाव तालुका शिवसेना ठाकरे पक्षाकडून मशाल पेटवून ती मातोश्रीवर घेऊन जाण्याचे नियोजन ठरले. शिवनेरीवर मशाल पेटवून ती नारायणगाव येथून मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आली.

त्याचवेळी मशालीचे स्वागत करण्यासाठी मंचर शहरातील शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी जमले. जिल्हाप्रमुख सुरेश भोर,ज्येष्ठ नेते अ‍ॅड.अविनाश राहणे,जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे,खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे इत्यादी पदाधिकारी रथातून ज्योत घेऊन मंचरला आले. ज्योतीच्या स्वागतासाठी माजी सरपंच दत्ता गांजाळे सरसावले.

लगेचच माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांनी हातवारे करत शिंदे गट तसेच भाजपच्या व्यासपीठावर वावरणार्‍यांना येथे मशालीचा स्वागताचा नैतिक अधिकार नाही, उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांना अधिकार आहे, असे टोमणे मारल्याने माजी सरपंच दत्ता गांजाळे हे पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले यांच्या दिशेने धावून गेले.तेथे मात्र दोघांमध्ये हातवारे करत झटापट आणि शिवीगाळ झाली.

दोघांमध्ये झालेली झटापट सोडवण्यासाठी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख दिलीप पवळे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, अरुण नाना बाणखेले यांनी दोघांनाही अक्षरश: ओढून बाजूला केले. त्यावेळी दोघांमध्ये झालेली भांडणे चौकातील शेकडो नागरिक पाहात होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दत्ता गांजाळे आणि राजाराम बाणखेले समर्थकांना बाजूला केले.दरम्यान घडलेला प्रकार हा बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिली.

माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शिंदे व ठाकरे दोन गट निर्माण झाल्यानंतर मी कधीही शिंदे गटाच्या कार्यक्रमाला गेलो नाही. अनेक पक्ष फिरून आलेल्यांनी मला पक्षनिष्ठेचा सल्ला देऊ नये, असा टोला त्यांनी राजाराम बाणखेले यांना लगावला. तर पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, माजी सरपंच दत्ता गांजाळे हे नेमके कोणत्या पक्षात आहेत, हे समजत नाही. मशाल स्वागतासाठी आम्ही चौकात आलो असता त्यांनी तिथे येण्याचे काही कारण नव्हते. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी आणि हा प्रकार झालेला बरोबर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *