पुणे
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवलं असून UPSC ने त्यांच्याविरूद्ध FIR दाखल केलाय. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी खोटा घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर चर्चेत असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
पुण्यात एक बनावट आयएएस तरूणी धूमाकूळ घालत असून महिलांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळत होती.पुण्यातील लोणी काळभोर परिसराती ही घटना आहे. या परिसरामध्ये एक बनावट आयएएस अधिकारी महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक करत होती. रेणुका ईश्वर करनुरे असं या बनावट आयएएस महिला अधिकारीचं नाव आहे.
पुण्यामधील वडकी परिसरामध्ये राहणाऱ्या रेणुकाने अनेक महिलांना दर महिन्याला दहा रूपये टक्क्याने पैसे उकळले. हे प्रकरण एका पीडित महिलेने पोलीस तक्रार केल्यावर समोर आलंय.बनावट आएएस अधिकारी रेणुकाने पीडित महिलेला दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने रेणुकाला आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये दिले असताना सुद्धा बनावट आयएस अधिकारी रेणुकाने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी केली.
मी आय एस अधिकारी आहे माझ्या नादाला लागू नको तुला कामाला लावेल, माझे पैसे तू ताबडतोब दे, अशी धमकी रेणूकाने पीडित महिलेला दिली.दरम्यान, या त्रासाला वैतागून पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी आता बनावट आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेणुकाची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.