पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना ! “या” गावात अवैध गर्भलिंग निदान,आरोग्य विभागाची कारवाई;डॉक्टरसह दलालाला रंगेहाथ पकडलं

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना ! “या” गावात अवैध गर्भलिंग निदान,आरोग्य विभागाची कारवाई;डॉक्टरसह दलालाला रंगेहाथ पकडलं

पुणे

बारामती तालुक्यातील माळेगावात अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारा फलटण तालुक्यातील डॉक्टर आरोग्य विभागाने आज पकडला. बारामतीतील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश जगताप आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे फौजदार युवराज घोडके यांच्या पथकांनी केलेल्या कारवाईत सोनोग्राफीच्या पोर्टेबल यंत्रासह दोन जणांना सोनोग्राफी करताना जागेवर पकडण्यात आलं.

याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात फलटण येथील डॉक्टर मधुकर चंद्रकांत शिंदे आणि बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील त्याचा दलाल नितीन घुले या दोघंविरोधात अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्यावरून गर्भधारणा पूर्व आणि प्रसवपूर्व रोग निदान तंत्र प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर तालुक्यात एक डॉक्टर पोर्टेबल यंत्र घेऊन सोनोग्राफी करत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालनालयाला मिळाली होती. त्यांनी ही माहिती जिल्हा आरोग्य विभागाला कळवली होती.

त्यानुसार वरील चारही तालुक्यातील डॉक्टर सतर्क होते.दरम्यान, आज डॉक्टर जगताप आणि फौजदार युवराज घोडके यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत माळेगावमध्ये एका महिलेचे अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्यानंतर दोघांना पकडले. यावेळी डॉक्टर शिंदे याने घुले याच्या मदतीने माळेगावातील संबंधित महिलेची अवैधरित्या गर्भलिंग चाचणी केल्याची माहिती दिली.

त्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र जप्त केले आहे. पुढील तपास माळेगाव पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *