पुणे
वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील डिंभे डावा कालव्यात उच्च शिक्षित तरुण दांपत्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उडी मारली. यापैकी पतीचा मृतदेह कालव्यातून काढण्यात गुरुवारी यश आले.तथापि पत्नीचा मृतदेह गुरुवारी (दि. २ ) मृतदेह मिळून आला.अंतर्गत वादातून ही आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पल्लवी चिराग शेळके (वय २४) व चिराग चंद्रशेखर शेळके (वय २८, दोघेही रा. अभंग वस्ती, वारूळवाडी) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नववर्षांच्या पहिल्याच दिवशी वारुळवाडी येथे राहत असलेले चिराग शेळके व त्यांची पत्नी पल्लवी शेळके यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकी गाडीवरून आले होते.
त्यावेळी डिंभे कालव्याला पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्या दोघांनी आपली गाडी कलव्याच्या बाजूला लावून हे जोडपे चर्चा करत असताना अचानक कालव्याच्या वाहत्या पाण्यात उडी मारली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.चिराग आणि पल्लवी यांचे १ एप्रिल २०२४ ला लग्न झालेले होते. चिराग हा आयटी कंपनीत नोकरीला तर पल्लवी ह्या एका नामवंत कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कामाला होते मात्र सुट्टीमुळे ते गावी आले होते.
त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना सदरची माहिती दिली.त्यानंतर घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, संतोष कोकणे, हवालदार काळुराम साबळे, सुभाष थोरात, पोलीस पाटील भुजबळ आले. स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेतला. चिराग शेळके याचा मृतदेह कालव्यातून काढण्यात यश आले; मात्र पल्लवी शेळके या कालव्यातील पाण्याबरोबर वाहून गेल्या.
अंधार पडल्याने त्यांचा शोध घेता आला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी जुन्नर अग्निशामक दल, जुन्नर रेस्क्यू टीम व आपदा मित्र यांच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याशी संपर्क साधून डिंभे डावा कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यास सांगण्यात आले. पल्लवी शेळके यांचा मृतदेह गुरुवारी (दि. २) मिळून आला.