पंढरीच्या वारीमध्ये हरवलेले पुणे जिल्ह्यातील “या” गावातील भगत आजोबा एक महिन्याने घरी परतले;गायकवाड यांच्या रूपात पंढरीचा पांडुरंग भेटला

पंढरीच्या वारीमध्ये हरवलेले पुणे जिल्ह्यातील “या” गावातील भगत आजोबा एक महिन्याने घरी परतले;गायकवाड यांच्या रूपात पंढरीचा पांडुरंग भेटला

पुणे

पिंपळगाव, ता. दौंड येथील येथील ७० वर्षीय वयोवृद्ध वारकरी बाळासाहेब भगत हे पंढरपूरच्या वारीमध्ये हरवले होते. भगत परिवाराने वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावामध्ये त्यांचा शोध घेतला.परंतु ते सापडत नव्हते.

शुक्रवार दिनांक २५ रोजी थेऊर (तालुका हवेली) येथे पिंपळगावचे भाचे असणारे अरविंद गायकवाड यांनी भगत यांना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता भगत परिवाराशी संपर्क केला. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बाळासाहेब भगत हे कुटुंबामध्ये मिसळले. गायकवाड यांच्या रूपामध्ये आम्हाला पंढरीचा पांडुरंग भेटला अशी भावना यावेळी भगत परिवाराने व्यक्त केली.

पिंपळगाव येथे शेतमजुरी करणारे बाळासाहेब भगत हे संगम येथील संतराज महाराज पालखी सोहळ्यामध्ये २२ जून रोजी सहभागी झाले. वयानुरूप विस्मृती होत असल्याने कुटुंबीयांचा विरोध डावलून त्यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वाटेमध्ये असताना ते सोहळ्यातुन हरवले. संबंधित बाब भगत यांचे चिरंजीव सचिन यांना कळवण्यात आली.

सचिन यांनी मित्रपरिवारासह आषाढी वारीतील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी सोहळा जाणाऱ्या ठिकाणी आपल्या वडिलांना शोधले. बाळासाहेब भगत यांच्याकडे मोबाईल, आधार कार्ड, ओळखपत्र नसल्याने संपर्क होण्यास अडचणी येत होत्या. तरीही गणेश भगत यांचे शोध कार्य सुरूच होते.

अशातच शुक्रवार दिनांक २५ रोजी दुपारी २.०० वाजता पिंपळगावचे भाचे असणारे अरविंद गायकवाड (राहणार नायगाव, तालुका हवेली) हे आपल्या ट्रकमधून थेऊर फाट्यावरून थेऊरकडे चालले होते. ट्रक चालवताना त्यांचे रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या भगत त्यांच्याकडे लक्ष गेले. गायकवाड यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पिंपळगाव मध्ये झाले होते.

तसेच भगत हरवले आहेत यासंदर्भातली माहिती त्यांनी आपल्या मामी शिल्पा गोंडवाल यांच्या मोबाईल स्टेटसला पाहिली होती. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला घेत त्यांनी भगत यांना ओळख विचारली. ओळख पटल्यानंतर गायकवाड यांनी आपले पिंपळगाव येथील मामा तुकाराम गोंडवाल यांना फोन करून भगत सापडल्याची माहिती दिली. दोन तासानंतर गणेश भगत हे थेऊर फाट्यावर आले.

वडील बाळासाहेब भगत यांना पाहताच गणेश यांना आनंदाश्रू आले. अरविंद गायकवाड यांनी भगत यांना आपल्या मुलाच्या ताब्यात दिले. त्यानंतर गणेश याने अरविंद गायकवाड यांचा सत्कार केला. वडील बाळासाहेब भगत यांना पेढे भरवले. सायंकाळी पिंपळगाव येथे एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर भगत आपल्या घरी विसावले,यावेळी कुटुंबीयांचा आनंद ओसंडून वाहत होता.

सचिन भगत ( मुलगा)

वडिलांनी शाळेची पायरी चढली नाही. आयुष्यभर कष्ट केले आहे. सलग २० वर्षे पंढरीची वारी केली. वयानुरूप विस्मृती झाल्याने यावर्षी आम्ही वारीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोध झुगारून ते वारीला गेले. हरवल्याचे समजल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. गेली २० दिवस हजारो किलोमीटर प्रवास करत वडिलांना शोधत होतो. अखेर अरविंद गायकवाड यांनी वडिलांना शोधले. गायकवाड यांच्या रूपात आम्हाला पंढरीचा पांडुरंग भेटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *