नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर,उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे बिनविरोध

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर,उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे बिनविरोध

पुणे

पुरंदर तालुका आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील ३६ गावांसाठीच कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड आज मंगळवारी करण्यात आली. सासवड येथील उपबाजारातील कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारपडली. यामध्ये काँग्रेसचे संदीप फडतरे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामती तालुक्यातील करंजे येथील रहिवासी असलेले बाळासाहेब शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

आज मंगळवारी सकाळी सभापती व उपसभापती पदासाठी या दोघांचेच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे या दोघांची अनुक्रमे सभापती आणि उपसभापतीपदी निवड करण्यात आली. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार यांचेच वर्चस्व राहिलेला आहे. यापूर्वीचे सभापती शरद जगताप  हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी कार्यकाळ संपताच राजीनामा दिल्याने सभापती आणि उपसभापतीपद हे रिक्त झाले होते. या रिक्त पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली आणि यामध्ये ही निवड करण्यात आली. 

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, शरद पवार एकत्र असताना झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे दहा उमेदवार निवडून आले होते. तर, काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कार्यकाळ वाटून घेण्यात आला होता. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक शरद जगताप यांना पहिल्यांदा सभापती करण्यात आले होते. 

राष्ट्रवादीच्या फुटी नंतर अजित पवार यांच्याकडे सहा बाजार समितीचे संचालक तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे चार संचालक असल्याचे बोलले जात होते. तर संजय जगताप यांच्याकडे आठ संचालक आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय समिकरणानुसार महाविकास आघाडीकडे एकूण बारा संचालक आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे बोलले जात होते. गेली दोन दिवस रात्र नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने उपसभापती पदावर दावा कायम ठेवत बाजी मारल्याने, शरद पवार गटाला उपसभापती पदाला मुकावे लागले असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *