निवडणूक जिंकली,पण चोरट्यानं खिसा कापला; जल्लोषावेळी “या” आमदारांचे ७५ हजार लांबवले

निवडणूक जिंकली,पण चोरट्यानं खिसा कापला; जल्लोषावेळी “या” आमदारांचे ७५ हजार लांबवले

पुणे

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी नवी मुंबईत पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. याच जल्लोषात म्हात्रे यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने तब्बल ७५ हजार रुपये चोरल्याची घटना घडली.

ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष केला. यावेळी म्हात्रे यांना आलिंगन देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला.यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं असता, त्यांच्या समोरच्या खिशात असलेले ५० हजार रुपये आणि मागच्या खिशात असलेले २५ हजार रुपये असे एकूण ७५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरले.हा प्रकार म्हात्रे यांच्या लागलीच लक्षात आला, मात्र चोरटा गर्दीत मिसळल्याने म्हात्रे यांना चोरट्याला ओळखता आलं नाही.

या प्रकारानंतर म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावरील पोलिसांना याबाबत तोंडी तक्रार केली.मात्र पोलिसांनाही हा चोरटा सापडू शकला नाही. म्हात्रे यांनी आज याबाबत माहिती दिली. सोबतच अशा गर्दीच्या ठिकाणी आणि जल्लोषात सहभागी होताना यापुढे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *