नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना

मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चिथावणीखोर विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये राणेंनी चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले. राणे राज्यसभेचे खासदार असल्यानं त्यांच्या अटकेवेळी प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंना अटक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना देण्यात येईल. हिंदी किंवा इंग्रजीत ही माहिती त्यांना दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *