धक्कादायक !!!!!! अहमदनगरमध्ये महिला सरपंचाला मारहाण, शिवीगाळ; रुपाली चाकणकरांनी ट्विटरवरुन व्यक्त केला संताप

धक्कादायक !!!!!! अहमदनगरमध्ये महिला सरपंचाला मारहाण, शिवीगाळ; रुपाली चाकणकरांनी ट्विटरवरुन व्यक्त केला संताप

अहमदनगर

पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची संतापजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सरपंच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिला सरपंचाला मारहाणीच्या लागोपाठच्या घडलेल्या घटनांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून महिला सरपंचावरील मारहाणीविरोधात आवाज उठवला आहे. ही मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि गुंडशाहीचा धुडगूस थांबवण्यात यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. महिला सरपंचाने व्हिडीओमधून गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारली व शिवीगाळ केली, असे महिला सरपंचाने व्हिडीओमध्ये म्हटले असून आरोपींविरोधात कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ग्रामसभेत आलेला वाईट अनुभव व्हिडीओमधून कथन केला आहे.

राणी काथोरे या उक्कडगावच्या सरपंच आहेत. बुधवारी 8 सप्टेंबरला तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिला. गावात ग्रामसभा चालू असताना मी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला. विरोधी पार्टीला ही निवड मान्य नव्हती. त्यांनी आरडाओरडा केला. मी सभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असं सांगितलं. पण तेही त्यांना मान्य झालं नाही. त्यानंतर त्यांनी जास्त आरडाओरडा केला. त्यानंतर मी कार्यालयाकडे निघाली, त्यावेळी भाजपच्या गुंडांनी पाठीमागून लाथ मारली, असा आरोप राणी कथोरे यांनी केला आहे. नंतर पोलिस ठाण्यातही माझी दखल घेतली गेली नाही. तिथे मला 2 ते 4 तास बसवून ठेवण्यात आले, असाही दावा कथोरे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *