शहरात रविवारी (ता.२७) झालेल्या भीषण अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य व त्यांच्या दोन मुली मधुरा व सई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, हा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांचे आज पहाटे निधन झाले.
यामुळे आचार्य परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोनच दिवसांपूर्वी आचार्य यांना महिन्याभराच्या उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. आपल्या वडिलांना फळे घेण्यासाठीच ओंकार आचार्य खंडोबा नगर येथील चौकात थांबले होते व तेथून निघताना कालचा दुर्दैवी अपघात झाल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले.
दरम्यान, ओंकार यांचे वडील राजेंद्र हे जवळपास महिनाभर बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना दोनच दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले होते. मुलगा व दोन नातवंडांच्या अकाली मृत्यूचा धक्का ते सहन करू शकले नाहीत, असे समोर येत आहे.
आचार्य कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून यातून कसे सावरायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. राजेंद्र आचार्य हे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी अनेक वर्ष शिक्षणाचे काम केले होते. एक लोकप्रिय शिक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती.