पुणे
अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरविन असा धमकी वजा इशारा हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिला आहे. माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान हा प्रकार घडला आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.खासदार हेमंत पाटील यांनी सोमवार सायंकाळी माहूर तालुक्यातील काही गावांचा आणि शेतशिवाराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याबाबत अनेकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या.
शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे खासदार हेमंत पाटील यांचा पारा चढला. त्यांनी थेट तहसीलदारांना अरेरावीची भाषा केली. “तू काय ब्रिटीशांची औलाद आहेस का? लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढलीय का?” असं म्हणत त्यांनी तहसीलदार किशोर यादव यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहूरच्या नुकसानीबाबत माहिती घेत असताना त्यांनाही तू तुझाच शहाणपणा शिकवतोस का?” अशा विविध कारणावरून खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांची खरडपट्टी काढली.
इतकंच नाही तर, अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरविन असा धमकी वजा इशारा सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.