पुणे
एक हजार एकराचे क्षेत्रफळ आणि दीड हजार लोकसंख्या असलेले एक गाव…राज्य शासनाने आवाहन केले आणि संपूर्ण गाव पुढे आले. गावातील पंधरा पाणंद रस्ते खुले केले. जिओ रेफरन्सिंग करून त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली.एवढ्यावर न थांबता सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) रस्त्यांचे क्राँकिटीकरण करून दुतर्फा वृक्ष लागवड करीत पुणे जिल्ह्याबरोबरच राज्यासमोर नवा आदर्श निर्माण केला.
ही गोष्ट आहे, पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी या गावाची. पाणंद, शिव, गाव नकाशातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करण्यात अडचणी येतात. त्यातून वादविवादही होतात. महसूल दाव्यांची संख्याही वाढते. नेमकी ही अडचण ओळखून शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे सोयीचे जावे, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनाचा आर्थिकस्तर उंचवावा, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकर घेत राज्यात पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला प्रतिसाद देत आडाचीवाडी हे गाव पुढे आले आणि गावचे भूमिपुत्र व रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची यासाठी पुढाकार घेतला आणि त्यातून हा इतिहास घडला.
गावाने एकत्र येत सहमतीने सर्व म्हणजे १५ पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम हाती घेतली. सुरुवातीला या सर्व रस्त्यांची भूमी अभिलेख विभागामार्फत रोव्हरद्वारे मोजणी करून त्या रस्त्यांचे जिओ-रेफरन्सिंग करून त्याचे नकाशे तयार करण्यात आले. एवढ्यावर न थांबता रस्त्यांची रुंदी २० फुटाने वाढविण्याचा निर्णय घेतला.
आप्तस्वकीयांची नावे न देता सर्व रस्त्यांना महापुरुषांची नावे दिली. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करून रस्त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी सर्व रस्ते ज्या सर्व्हे नंबरमधून जातात, त्या ४३२ जमिनींच्या उताऱ्यावरील इतर अधिकारांत ‘ग्रामस्थांची वहिवाट’ अशी नोंद घेण्यात घातली. शेतीमालाची वाहतूक करणे सोयीचे जावे, यासाठी रस्त्यांचे सिमेंट क्राँकिटीकरणदेखील करण्यात आले. जेणेकरून भविष्यात या रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये आणि कायमस्वरूपी खुले राहावेत, हा त्यामागचा उद्देश असल्याचे आडाचीवाडीचे सरपंच सुवर्णा बजरंग पवार आणि उपसरपंच मोहन निवृत्ती पवार यांनी सांगितले.
एकमेव ग्रामपंचायतीचा मान
गावाने रस्त्याच्या दुतर्फा नारळ व जांभळाच्या एक हजार झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. झाडांच्या संगोपनासाठी ‘मनरेगा’ अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २०० झाडामागे एक अशा पाच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. १२ फूट रुंदीचे एकूण ५ किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रिटचे ४ पाणंद रस्ते असलेले, त्याचबरोबर एकाच दिवशी १५ पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्यावरील अतिक्रमणे दूर करून, सातबारा उताऱ्यावर नोंद घेत त्या रस्त्यांना महापुरुषांची नावे आणि सांकेतिक क्रमांक देणारी आडाचीवाडी ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
आडाचीवाडी गावाने सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीने पाणंद रस्ते खुले करून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यापासून अन्य गावांनीही प्रेरणा घ्यावी. गावच्या विकासासाठी संदेश शिर्के यांनी जसा पुढाकर घेतला, तसा पुढाकार इतर अधिकाऱ्यांनीही घ्यावा:जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
गावाने राबविलेले उपक्रम
• गावातील सर्व पाणंद रस्ते खुले केले.
• मोजणी, जिओ रेफरन्सिंग करून नकाशे तयार केले.
• सातबारा उताऱ्यावर रस्त्यांची नोंद, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड
• २०० झाडामागे एका युवकाला तीन वर्षांसाठी रोजगार
• रस्त्यांना महापुरुषांची नावे.