चोरट्यांनी रस्त्यावर नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले

चोरट्यांनी रस्त्यावर नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले

इंदापूर

“आवळा देऊन कोहळा काढणे” या म्हणीचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पहावयास मिळाला आहे. पैसे लुटण्याच्या इराद्याने चोरट्यांनी नामी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. चोरट्यांनी चक्क रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या या नोट उचलण्याच्या मोहापायी जे बाईकस्वार उतरायचे, त्यांच्या दुचाकीवरील ऐवज लुटून पसार होण्याचा त्यांचा प्लॅन होता. या योजनेनुसारच बाईकवरुन खाली उतरलेल्या एका दुचाकीस्वाराचे 2 लाख 33 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दुपारी इंदापूर शहरात घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमधून दोन लाख तेहतीस हजार रुपये घेऊन फिर्यादी घराच्या दिशेने जात होता. यावेळी इंदापूर शहरातील हिरो मोटरसायकल शोरुमच्या जवळ असलेल्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी लबाडीच्या उद्देशाने दोन-चार नोटा टाकलेल्या होत्या. त्या उचलण्याच्या नादात फिर्यादी बाईकवरुन उतरला, आणि हीच संधी साधून त्याच्या बाईकच्या हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरांनी लंपास केली.

या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे ही घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. या दृश्यात असे दिसून येत आहे की अन्य दुचाकीवरील दोन आरोपी हे रस्त्यावरती दोन नोटा फेकत आहेत. त्यानंतर मागून येणारा दुचाकीस्वार रस्त्यालगतच त्याची दुचाकी थांबवून त्या नोटा उचलत आहे. ज्यांनी या नोटा रस्त्यावर टाकलेल्या होत्या, त्यांनीच नोटा उचलणाऱ्याच्या गाडीच्या हँडलवर लावलेले बॅग लंपास केलेली आहे. या चोरी प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *