चिंताजनक! पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला ‘झिका’ विषाणूचा रुग्ण

चिंताजनक! पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला ‘झिका’ विषाणूचा रुग्ण

मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी

महाराष्ट्र कोरोना रोगाच्या संकटातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेपुढे एक मोठे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. जगभरात पसरत असलेला कोरोना आणि इतर सापडलेले नवीन व्हायरस यांचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्यव्यवस्था पूर्णपणे जोर लाऊन काम करीत आहे.कोरोना रोगाची दुसरी लाट संपतेच तोपर्यंत तिसऱ्या लाटेचे संकेत सध्या मिळत आहेत. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्य विभाग काम करीत आहे.
यातच एक आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारी बाब म्हणजेच
नुकताच कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावात झिका नावाचा विषाणु आढळून आलेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर या गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
बेलसर मध्ये मागील एक ते दिड महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने एनआयव्ही (National Institute of Virology) पुणे यांनी बेलसर(ता.पुरंदर) मधील काही ५१ जणांचे रक्त नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रमुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचे जाणवून आले आणि २५ चिकनगुनिया तर ३ डेग्यू चे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बेलसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास शनिवार (दि.31) रोजी भेट देत पाहणी केली व त्वरित पुढील उपाय-योजना करण्याचे आदेश दिले.जिल्हा आरोग्य विभाग देखील बेलसर गावामध्ये दाखल झाला आहे.

झिका वायरसपासून बचाव करण्यासाठी अजून कोणतही औषध उपलब्ध नाही. अशात स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हाच एकमेव झिका वायरसचा धोका टाळण्याचा आणि त्यापासून दूर राहण्याचा उपाय आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून याबद्दल पुरेपूर माहिती दिली जात आहे. या विषाणूस कोणीही घाबरून न जाता काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अशा प्रकारच्या विषाणूमुळे ब्राझीलमध्ये नवजात बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम दिसून आलाय. यामुळे मेदूंची वाढ अपुरी होते. त्यामुळे डॉक्टरांकडून या रोगाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे झिका विषाणू?
१९४७ मध्ये हा विषाणू सर्वप्रथम सापडला होता. सर्वप्रथम तो विषाणू आफ्रिका आणि एशिया मध्ये आढळून आला होता.

झिका वायरस ची लक्षणे:-
झिका वायरसग्रस्त लोकांमध्ये ताप,सांधेदुखी,अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या लोकांना या वायरसने ग्रासले आहे त्यांनी भरपूर आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *