पुणे
मॅट्रिमोनी वेबसाइटवर ओळख झालेल्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने या घटनेचे खासगी फोटो आणि व्हिडीओ काढून तरुणीला ब्लॅकमेल केले.तिच्याकडून तब्बल 2 लाख रुपये उकळले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमितची एका मॅट्रिमोनी वेबसाइटवर पीडित तरुणीसोबत ओळख झाली होती. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तरुणीचा विश्वास जिंकला.
यानंतर, तो पुण्यात आला आणि तरुणीला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या नकळत तिचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर त्याने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार इथेच थांबला नाही.
लग्नास नकार दिल्यानंतर त्याने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ नातेवाईकांना पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीकडून टप्प्याटप्प्याने 2 लाख रुपये घेतले.
पीडित तरुणीने पुन्हा लग्नाबद्दल विचारणा केली असता, आरोपीने ‘विषारी औषध पिऊन आत्महत्या करीन आणि चिठ्ठीत तुझे व तुझ्या कुटुंबाचे नाव लिहीन’ अशी धमकी दिली. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने खराडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.