पुणे
जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदनापूर तालुक्यातील ढासला गावात चक्क शिक्षकानेच बारावीच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेलं आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संतप्त झालेल्या पालकासह परिसरातील नागरिकांनी मुख्याद्यापकाला जाब विचारत शाळेला कुलूप ठोकलं आहे.
जोपर्यंत आमची मुलगी परत येत नाही, तोपर्यंत आम्ही शाळेचं कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका मुलीच्या पालकासह परिसरातील नागरिकांनी घेतली आहे. महेंद्र साठे असं विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या शिक्षकाचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने फूस लावून पळवून नेलेली विद्यार्थिनी नुकतीच सोनामाता माध्यमिक आणि उच माध्यमिक हायस्कूलमधून बारावी परीक्षा पास झाली होती. याच शाळेत महेंद्र साठे हा इंग्रजी विषय शिकवत होता. दरम्यान, बारावी पास झाल्यानंतर महेंद्र याने पीडित विद्यार्थिनीला संगणकाचे क्लास लावण्याचा सल्ला दिला.
बदनापूर येथे क्लास लावून देतो, असे सांगत त्याने मंगळवारी ४ वाजेच्या सुमारास विद्यार्थिनीला तेथे बोलावून घेतले. दरम्यान, विद्यार्थिनी तेथे गेली असता, महेंद्र याने तिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार विद्यार्थिनीच्या पालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनामाता विद्यालयात धाव घेतली.
आमची मुलगी जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही, असं म्हणत संतप्त झालेल्या पालकासह परिसरातील नागरिकांनी सोनामाता विद्यालयाला कुलूप ठोकलं. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक महेंद्र साठे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल आणि विद्यार्थिनीला सुखरूप घरी आणण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. शाळेतील शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवून नेल्याची घटना समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.