पुणे
जळगाव जिल्ह्य़ातील देवगाव पारगाव येथे वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीकडून परवानगी देण्यात आली होती. या कामाचा मोबदला म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
देवगाव पारगाव (ता, चोपडा) येथील तक्रारदारांचे पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीचे परवानगी मिळावी म्हणून तक्रारदारांनी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.
दरम्यान संशयित आरोपी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय ३९) यांनी वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. ही परवानगी दिल्याच्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदारांकडे ७ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
यानंतर ३१ जानेवारीला दुपारी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता ग्रामसेवक हेमचंद्र सोनवणे यांनी तडजोडीअंती तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ग्रामसेवकास अटक करून त्यांच्यावर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.