पुणे
पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात चालू असलेली केस सासू मागे घेत नाही याचा राग मनात धरून जावयाने सासू वर चाकुने वार केल्याची घटना नायगाव (ता.हवेली) येथे घडली आहे. या घटनेत अलका विठ्ठल गवळी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी रूपाली संग्राम शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संग्राम बळवंत शिंदे असे आरोपीचे नाव आहे.लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रूपाली शिंदे या त्यांच्या आई अलका गवळी यांच्यासोबत नायगाव येथे राहतात.
फिर्यादी यांची पोटगी व मुलीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात केस चालू आहे.आरोपी संग्राम शिंदे हा बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता नायगाव येथील त्याच्या सासूच्या घरी आला. तो त्याची पत्नी रूपाली यांना म्हणाला “केस मागे घे” यावर जे काही होईल ते कोर्टात होईल असे रूपाली म्हणाल्या, त्यावेळी संग्राम यांनी टिफिन च्या पिशवीतून आणलेला धारदार चाकू काढत तुला जीवानिशी सोडणार नाही असे म्हणत अंगावर धावून गेला.
यावेळी रूपाली यांची आई अलका गवळी मध्ये आल्याने “तुझ्यामुळेच सगळे होत आहे, तूच केस मिटवु देत नाही,तुलाच खल्लास करतो” असे म्हणत अलका यांच्या पोटात तीन वेळा चाकू घुसवुन त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.