पुणे
ऊस तोडणीसाठी मजूर उपलब्ध करून देतो, तसेच तोडणी व वाहतूक करून देतो,’ असे सांगून येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे ६० लाख ९० हजार ४०० रुपये रकमेचा अपहार केल्याच्या कारणावरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
श्री विघ्नहर साखर कारखान्याचे मुकादम अशोक सोनवणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. हा गुन्हा २६ जुलै २०२४ ते २ सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी रामराव किसन आंधळे (२४ लाख ५३ हजार ९२० रुपये), बिपिन उत्तम आंधळे (६ लाख २२ हजार ४०० रुपये), भागवत उद्धव आंधळे (४ लाख रुपये), भीमराव धोंडिबा आंधळे (९ लाख ३३ हजार ६०० रुपये), शहादेव चिंतामण आंधळे (८ लाख ९ हजार १२० रुपये), (सर्व रा. आंधळेवाडी, पो. विडा, ता. केज, जि. बीड) व दीपक कारभारी सानप (८ लाख ७१ हजार ३६९ रुपये) (रा. पानेगाव, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ सुरू होण्यापूर्वी आरोपींनी नोंदणी केलेल्या उसाची तोडणी व वाहतूक करून कारखान्यात आणण्याचे काम करण्यासाठी आरोपींनी मुकादम सोनवणे, तसेच कारखान्याचे अधिकारी यांची वेळोवेळी भेट घेतली. कारखान्याचा विश्वास संपादन केला. एकमेकांशी संगनमत करून, तसेच एकमेकांस जामीनदार राहून या कामाचा करारनामा केला.
या कामापोटी कारखान्याकडून वेळोवेळी आगावू रकमेची मागणी केली. ही रक्कम कारखान्याने बँकेमार्फत त्यांच्या खात्यावर जमा केली. त्यानंतरही आरोपींनी कामगार उपलब्ध करून दिले नाहीत. ऊस वाहतूक करून दिली नाही. कारखान्याने दिलेल्या रकमेचा अपहार करून आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.