नागपूर
कन्हान नदीघाटावर आत्महत्या केलेल्या प्रेमिकेच्या जळत्या सरणावर तरुणाने सोमवारी दुपारी उडी घेण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे संतप्त जमावाने तरुणाला चोप दिला.या जखमी तरुणावर कामठीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनुराग राजेंद्र मेश्राम (२७) रा. हनुमान नगर, कन्हान ता. पारशिवनी असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंशिका नितीन खोब्रागडे (१९) रा. हनुमान नगर, कन्हान ता. पारशिवनी तिचे त्याच परिसरातील अनुराग या तरुणांसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. प्रेमात नैराश्य आल्याने अंशिकाने आठ जूनला आत्महत्या केली. नातेवाईकांनी कन्हान नदी पात्रात अंशिकाच्या अग्निसंस्काराचा विधी सुरू केला.
दरम्यान, अनुराग मद्यधुंद अवस्थेत तिथे आला. त्याने अंशिकाच्या जळत्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी अनुरागला लाथा बुक्क्यांनी चोप दिला. त्यात अनुराग जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर नातेवाईक तेथून निघून गेले.
अनुराग कन्हान नदीपात्रात पडून असल्याची माहिती काही नागरिकांनी अनुरागचे वडील राजेंद्र मेश्राम व मोठा भाऊ पवन मेश्रामला दिली. दोघेही कन्हान पोलिसांना घेऊन कन्हान नदी पात्रावर पोहचले. त्यांनी अनुरागला कामठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे तज्ज्ञांच्या देखरेखीत अनुरागवर उपचार सुरू आहेत.