पुणे
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या निर्णयावरून गावातील एका गटाने ग्रामसेविका शकिला पठाण यांना आठवडे बाजारात रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली.तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह इतर कर्मचार्यांनाही मारहाण झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकारी, कर्मचार्यांनी मोर्चा काढून पोलिस व महसूल कार्यालयांसमोर ठिय्या मांडत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक होईपर्यंत (दि. 16) पासून जिल्हाभर ग्रामपंचायत कामकाज बंदचे आंदोलन सुरू होणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे व तालुकाध्यक्ष दादासाहेब भिंगारदे यांनी सांगितले.
म्हैसगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण मोहिमेवरून धुसफूस सुरू आहे. ग्रामपंचायत भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामसेविका पठाण यांना गावातील काही अतिक्रमणधारकांनी घेराव घालत शिवीगाळ केली. त्यानंतर जोरदार मारहाण सुरू केली. नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली.
घटनास्थळी आलेले ग्रामपंचायतीचे क्लार्क तुषार विधाटे व कर्मचारी कैलास केदार, विलास बुळे यांनाही एका गटाने मारहाण केली. या वेळी ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या दुकानांवरही हल्ला करण्यात आल्याचे समजते. भाऊसाहेब यादव व प्रकाश यादव यांनाही एका गटाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचे समजले आहे. ग्रामसेविका पठाण या गंभीर जखमी असताना 5 जणांना नगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.