पुणे
जळगाव तालुक्यातील किनोद गावातील गायत्री कोळी नावाच्या २६ वर्षीय महिलेने १ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. आत्महत्येची बातमी कळताच गायत्रीच्या माहेरच्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, या प्रकरणी गायत्रीच्या माहेरच्यांनी आत्महत्येवर संशय व्यक्त केला होता.
गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चौकशी केली असता हि आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले आहे.
गायत्री हि तिच्या पती, सासू आणि दोन मुलांसोबत राहत होती, मासिक पाळीच्या काळात जेवण बनवले म्हणून सासू आणि नणंद सोबत गायत्रीचा वाद झाला होता. या शुल्लक गोष्टीमुळे गायत्रीच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण करून गळा दाबून खून केला. त्यानंतर सासू आणि नणंदने साडीने लटकून आत्महत्या केल्याचे भासवले होते.
गायत्रीला पाळी आली होती. पाळीत केलेला स्वयंपाक तिच्या सासरच्यांना चालत नव्हता. हा वाद विकोपाला गेला. घडलेला संपूर्ण प्रकार गायत्रीने वडिलांना सांगितला होता. घडलेल्या घटनेनंतर तिचे पती, सासू आणि नणंद फरार झाले होते.
दरम्यान, गायत्रीच्या माहेरच्यांनी दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे म्हणत आक्रोश केला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. गायत्री आणि तिच्या दोन मुलांसाठी गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी न्यायाची मागणी करत आहेत.