पशुवैद्यकीय विभागाकडून लंपी लसीकरण सुरू
पुरंदर
कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथे लंपी सदृश्य आजाराचे एक जनावर (खोंड) आढळून आले होते. लंपीसदृश्य आजाराने ग्रासलेले हे जनावर शुक्रवारी रात्री मृत पावले आहे. पशुवैद्यकीय विभागाने पशुपालकांना आपल्या जनावरांची खबरदारी घेण्याच आवाहन केले आहे. त्याचबरोबर लंपी आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या वर्षी देशभरात लंपी आजाराने थैमान घातले होते. अनेक जनावरे या आजाराने मृत्यूमुखी पडली होती. यानंतर राज्यात पशुवैद्यकीय विभागाने लसीकरण मोहीम राबवून लंपी आजार आटोक्यात आणला होता. मात्र या आजाराने पुन्हा डोकेवर काढण्याचे पाहायला मिळते आहे. पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी या गावांमध्ये लंपी सदृश्य आजाराचे एक जनावर मृत आढळून आले आहे.
कर्नलवाडी येथील श्रीकृष्णमठ या परिसरामध्ये असलेल्या भागांमध्ये महादू दादा महानवर यांच्या गोठ्यातील दोन वर्ष वयाच्या खिलार जातीचा खोंड या आजाराला बळी पडला आहे. पंधरा दिवसापासून हे खोंड आजारी असून महानवर यांनी खाजगी डॉक्टर कडून त्यावर उपचार केले. मात्र ते आजारातून बरे झाले नाही. कर्नलवाडीचे पोलीस पाटील दिनेश खोमणे यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती पशुवैद्यकीय विभागाला दिली. यानंतर पशुवैद्यकीय विभागाने या रुग्णाची पाहणी केली. रात्री उशिरा ते खोंड मृत पावल्यानंतक्ष शेतकऱ्याने त्याला खोल खड्डा घेऊन पुरले आहे.
दरम्यान अशा प्रकारे लंपी आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. कर्नलवाडी, गुळूंचे, राख, रणवरेवाडी या भागांमध्ये पशुवैद्यकीय विभागाकडून सध्या लंपी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपली जनावरे लसीकरण करून घ्यावीत अस आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यातील जनावरांकडे लक्ष द्यावे. गोठा स्वच्छ ठेवावा. जनावरांमध्ये जर लंपी सदृश्य आजाराची काही लक्षणे आढळून येत असतील तर तातडीने पशुवैद्यकीय विभागाकडून उपचार करून घ्यावेत. शासकीय पशुवैद्यकीय विभागाकडून यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे.”:डॉ. अस्मिता साताळकर (पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती पुरंदर)