पुरंदर
पुरंदर तालुक्यात असंख्य ग्रामपंचायतीत महिलाराज पहावयास मिळत आहे.परंतु बऱ्याच ग्रामपंचायतीत सरपंच पद व उपसरपंच पद हे ज्या महिलांकडे आहे तिथे त्यांच्या घरच्यांचा हस्तक्षेप त्यांच्या कारभारात पहावयास मिळत आहे. विशेषत: महिला सरपंचांच्या व उपसरपंचांच्या पतीपेक्षा त्यांच्या मुलालाच सरपंच व उपसरपंच झाल्यासारखं सध्या वाटत असल्याचे चित्र दिसत आहे.
बऱ्याचश्या ग्रामपंचायत विकास कामांच्या बाबतीत निर्णय घेताना त्यांच्या मुलाचा हस्तक्षेप होताना निदर्शनास आले असून अशा वृत्तींना नावानिशी जाहीर करून संपूर्ण पुरंदर तालुक्याला या विषयाची माहिती संजीवनी न्यूज च्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
मुळातच महिलांना आरक्षण दिल्याने महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल व्हायला पाहिजे होती, त्या महिला पदाधिकाऱ्याने निर्णय घ्यायला पाहिजे होते परंतु ग्रामीण भागात सध्या घरच्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नागरिकांमध्ये ही सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.
काही अडचण असल्यास नक्की तक्रार त्या महिला पदाधिकाऱ्यांकडे करायची,की गावच्या कारभारात ढवळाढवळ करणार्या मुलाकडे करायची असा प्रश्न सध्या पुरंदर तालुक्यातील काही गावात उपस्थित होत आहे.
निवडणूक लढवताना आरक्षण असल्याने महिलांचे नाव पुढे करायचे आणि निवडून आल्यानंतर त्या घरातील पुरुषांनीच तो कारभार करायचा का? अशाच प्रकारची कुजबूज सध्या पुरंदर तालुक्यात ऐकायला मिळत आहे.