पुणे
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत तपास करत असताना या मोटरसायकल चोरीमध्ये प्रत्यक्ष एक कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आठ मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या असून या मोटरसायकल खरेदी करणाऱ्या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांना कोर्टाकडून जामीन देण्यात आला आहे. तर मुख्य आरोपीला येरवडा कारागृहात पाठवले आहे.
या संदर्भातून जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विनोद मारुती नामदार याला मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने आठ मोटरसायकल चोरीची कबुली दिली आणि या आठ मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांनी निरा येथील मोटरसायकल खरेदी करणारे अस्लम मुलानी आणि मुरूम येथील पृथ्वीराज ठोंबरे यांना देखील ताब्यात घेतलं होतं कोर्टाने त्यांना जमीन मंजूर केला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील निरा आणि परिसरामध्ये मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलं होते. आणि यानंतर या चोऱ्या रोखण्यासाठी नागरिकांनी एक मोठा दबाव पोलिसांवर आणला होता.
पोलीस प्रशासनाच्यावतीने याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आणि गुप्त माहिती दाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी विनोद मारुती नामदार (राहणार वाणेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने आठ मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे. विशेष म्हणजे विनोद मारुती नामदार हा पोलीस कर्मचारी असून तो पुणे येथे मुख्यालयात काम करतो.
तो मूळचा वानेवाडी येथील रहिवासी असून या भागात आल्यावर तो या मोटरसायकल चोरी करत असे आणि या चोरी केलेल्या मोटरसायकल तो वेगवेगळ्या गावात लोकांना विकत असे. यातील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोर्टाने त्याला येरवडा जेलमध्ये पाठवल्याने पोलिसांना अधिकचा तपास करता आला नाही.
मात्र या संदर्भात पुढील गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अधिकचा तपास करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे
.