पुरंदरला लागोपाठ तिसरा धक्का !!!!! गुंजवणी प्रकल्प,विमानतळानंतर राष्ट्रीय बाजाराची पुरंदरमधून गच्छंती

पुरंदरला लागोपाठ तिसरा धक्का !!!!! गुंजवणी प्रकल्प,विमानतळानंतर राष्ट्रीय बाजाराची पुरंदरमधून गच्छंती

पुरंदर

छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा गाशा गुंडाळल्यानंतर आता पुरंदर तालुक्याला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. दिवे ता. पुरंदर येथे प्रस्तावित असलेला राष्ट्रीय बाजारही तालुक्याच्या हातून निसटला असून त्यासाठी नव्याने हवेली तालुक्यातील साष्टे या गावात ५३ एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याची १२५ एकर जागा आणि साष्टे येथील ५३ एकर जागा अशी एकूण १७८ एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीने निश्चित केलेली आहे.       

गेल्या वर्षी गुंजवणी प्रकल्पातील विनावापर असलेले पाणी बारामती, इंदापूर, अकलूज, फलटण, माळशिरस व इतर तालुक्यांना विभागून देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यानंतर या प्रकल्पातील जलवाहिनीच्या कामाची गती कमालीची मंदावली. तालुक्यासाठी हा पहिला जबर धक्का होता. नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द करून ते बारामती येथे अदानी उद्योगसमूहाकडून उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्याने पुरंदरला दुसरा मोठा धक्का पचवावा लागला.

रोजगाराच्या हजारो संधी पाण्यात
आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय बाजार यामुळे कित्येक हजार मुलांच्या रोजगाराची समस्या निकालात निघणार होती. पुरंदर तालुका या प्रकल्पांकडे त्यादृष्टीने आशेने पाहत असतानाच हा आघात झाला. त्यामुळे तालुक्यातील मुलांची रोजगाराची स्वप्न अक्षरशः धुळीला मिळणार आहेत.

या दोन  धक्क्यातून तालुका सावरतो न सावरतो तोच राष्ट्रीय बाजाराच्या रुपात आता तिसरा धक्का तालुक्याच्या वाट्याला आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा मिळालेला आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महाराष्ट्रासह परराज्यातून भाजीपाला व फळांची होणारी प्रचंड आवक यामुळे बाजार समितीला सध्याची जागा अपुरी ठरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) पर्यायी जागेसाठी मागणी केलेली होती.

तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मार्केटसाठी दिवे ता. पुरंदर येथील ४०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला दिला होता. विभागीय आयुक्त कार्यालयात यासंबंधी ना. शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडून मान्यतेसाठी हा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाला होता.  शिवतारे यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्याला शासनाने हिरवा कंदील दाखवला. मात्र २०१९ साली राज्यात सत्ता परिवर्तन झालं. खुद्द पुरंदर तालुक्यात शिवतारे यांचा पराभव होऊन कॉंग्रेसचे संजय जगताप आमदार झाले.

आमदार जगताप यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत तालुक्याला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे.  या निर्णयामुळे राष्ट्रीय बाजाराचा घासही पुरंदरच्या तोंडून हिरावला गेला आहे. पुरंदर तालुक्यातील महत्वाचे प्रकल्प पळवणे किंवा गुंडाळणे हा राष्ट्रवादीचा कार्यक्रम असून आमदार जगताप हे त्यांच्या हातचे बाहुले आहेत असा आरोप शिवतारे हे सातत्याने करत आले आहेत. हे तीन धक्के पाहिल्यानंतर शिवतारे यांच्या आरोपात तथ्य आहे असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *