पुण्यातील निबंध स्पर्धेची राज्यात चर्चा, रवींद्र धंगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण;विषय आहे-माझा बाप बिल्डर असता तर…!

पुण्यातील निबंध स्पर्धेची राज्यात चर्चा, रवींद्र धंगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण;विषय आहे-माझा बाप बिल्डर असता तर…!

पुणे

कल्याणीनगर अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे आज (रविवारी) निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.

उपरोधिक पद्धतीने आयोजित या स्पर्धेची शहरात मोठी चर्चा आहे.अपघात झाला, त्या कल्याणीनगरमधील बॉलर पबसमोर सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ही स्पर्धा होईल. यासाठी आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. माझी आवडती कार, दारूचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर, रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे, अश्विनी कोस्टा, अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण, आजची तरूण पिढी आणि अन् व्यसनाधीनता, नियम पाळा, अपघात टाळा अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे, मी पोलीस अधिकारी झालो तर, भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का, माझ्या स्वप्नातील पुणे शहर- असं असावं माझं पुणे शहर आदी विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वय १७ वर्ष ८ महिने आहे. त्यामुळे त्यापुढील ५८ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी ही स्पर्धा खुली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती संयोजक राहुल शिरसाट आणि सुनील मलके यांनी दिली. पुणेरी शालजोडे पद्धतीने आयोजित या स्पर्धेची शहरात जोरदार चर्चा आहे.

दरम्यान पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. महागड्या पोर्शे कारची नोंदणी आरटीओ कडे करण्यातच आली नव्हती. त्यामुळे कारला नंबर प्लेट नव्हती.

अल्पवयीन आरोपी अपघाताआधी हॉटेलमधून निघाला होता. तिथे त्यानं मद्यपान केलं होतं. त्या बारमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. शिक्षा म्हणून त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता.या प्रकरणाने व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

आरोपीवर कठोर कलम लावली नाहीत, असं काहींच मत आहे. त्यातून पुणे पोलिसांवर देखील अनेक गंभीर आरोप झाले. या प्रकरणात गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना कळवली नाही, म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे.

या अपघातानंतर पुण्यातील पब संस्कृती आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ताशेरे ओढले. यानंतर आता पुणे यवक काँग्रेसने चक्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *