पुण्याच्या “या” मतदारसंघात प्रचाराला या, सात हजार रुपये मिळावा!

पुण्याच्या “या” मतदारसंघात प्रचाराला या, सात हजार रुपये मिळावा!

पुणे

पुण्यातील चिंचवड आणि कसबा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात युती आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये कसब्यात प्रचाराला येण्यासाठी लोकांना 7 हजार रुपये दिले जात असल्याचे समोर आले आहे.

कसबा पोटनिवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. परंतु प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी आता नेत्यांना कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळतय. आता यासाठी पुण्यातील एका एजन्सीला प्रचारामध्ये लोक गोळा करण्यासाठी चक्क उमेदवाराने कॉन्ट्रॅक्ट दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

या एजन्सीने पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना तब्बल सात-सात हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. कसबा पेठेतील अनेक तरुणांना या एजन्सीकडून फोन गेले आहेत. या एजन्सीकडून आलेल्या फोनवर लोकांना स्वारगेट जवळील एक ऑफिसमध्ये येण्यास सांगितले जात आहे. तसेच त्यांना पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये काम केल्यानंतर 7 हजार रुपये देण्यात येईल असं देखील सांगितलं जातंय. या ऑडिओ क्लिपची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला यायचे याचा उल्लेख नाही. परंतु कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लोकांना ही एजन्सी 7 हजार रुपये देण्याचा दावा करत आहे. एकीकडे या निवडणुकीत उमेदवार उतरवणारे सर्वंच पक्ष आपलाच उमेदवार कसा लोकप्रिय आहे आणि तोच निवडणून येणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे असे लोकांना प्रचारासाठी पैसे देऊन बोलवले जात आहे. त्यामुळे अशी वेळ नेमक्या कोणत्या उमेदवारावर आली आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *