पुणे
पुण्यातील कल्याणीनगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. येथे अल्पवयीन मुलीने पीकअप गाडीने दोघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा जागेवर मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीकअप गाडीच्या मागच्या चाकाखाली ३० ते ४० फूट फरफट नेल्याने तरुणाचा मृत्यू झाला.
अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसरा महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव बांडे – आरणागाव रोडवर पोलिस पाटील असलेल्या संतोष लेंडे यांनी त्यांची अल्पवयीन मुलीला त्यांची पीकअप चालवण्यासाठी दिली. ते स्वतः दुसऱ्या सीटवर बसले. रस्त्यावरून दुचाकीवर अरुण मेमाणे आणि महेंद्र बांडे हे डीपीचे ऑईल आणण्यासाठी जात होते. पीकअप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसली.
या धडकेत दुचाकीवरील तरुण खाली पडले त्यातील अरुण मेमाणे हा पीकअपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला ३० फुटापर्यंत फरफट नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.अपघात घडल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेले. यावरून त्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत मृत युवकाचा भाऊ सतिश विठ्ठल मेमाणे याने शिक्रापूर पोलिसात तक्रार दिली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, अरुण मेमाणे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.