पुणे
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे आईच्या माहेरच्या हिस्स्यावरून भाच्याने मामाचा कारने अपघात घडवून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आईने स्वखुशीने हक्कसोड करून जागा भावाला देऊनही, भाच्याने मामाकडे जागेचा हिस्सा मागितला आणि न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी, जातेगाव बुद्रुक येथील दीपक मोरे यांची बहिण सुनीता थेऊरकर यांनी २०१९ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मालकीची जमीन स्वेच्छेने भावाला हक्कसोड करून दिली होती.मात्र, त्यानंतर सुनीता यांचा मुलगा मयूर युवराज थेऊरकर हा मामाकडे येऊन जागेचा हिस्सा मागत होता.
त्याने मामा दीपक मोरे यांसह आजी बेबी मोरे यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही दिली होती.दरम्यान, दीपक मोरे हे त्यांच्या दुचाकीवरून दूध घेऊन जात असताना दबा धरून बसलेल्या भाचा मयूरने त्याच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक देऊन अपघात घडवला आणि मामा दीपक मोरे यांच्या खुनाचा प्रयत्न केला.
या अपघातात दीपक मोरे गंभीर जखमी झाले आहेत.दीपक सुखदेव मोरे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्यात मयूर युवराज थेऊरकर (रा. धानोरे, ता. शिरूर) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख करत आहेत.