पुणे
तीन वेळा अर्ज करुन देखील मूळ प्रकरणाची नक्कल न मिळाल्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्याचा राग धरुन बेताल बोलणाऱ्या मुख्यालय सहाय्यकाने, पोलीसांना पाचारण केल्यानंतर पोबारा केल्याची घटना सोमवारी ( दि.२०) दुपारी येथील भूमि अभिलेख खात्याच्या कार्यालयात घडली.
विवेकानंद कुलकर्णी ( रा. पळसदेव, ता.इंदापूर) असे या मुख्यालय सहाय्यकाचे नाव आहे. त्यांनी संबंधित तक्रारदारास,’मी पळसदेवचाच आहे. खानदानी पैसेवाला आहे. माझा साडेसतरा एकर ऊस, केळी आहे. काही ही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतो. तुम्ही साहेबाला पाठवले काय किंवा कोठे पाठवले तरी मी घाबरणार नाही’ अश्या शब्दात सुनावले होते.
विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात खुलमखुल्ला गुटखा खात त्यांनी ही बेताल बडबड केली होती. या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर वायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा पूरती मलीन झाल्याचे चित्र आहे.
सविस्तर वृत्त असे की, संतोष महादेव रकटे (रा. शेटफळगढे, ता.इंदापूर) यांनी शेटफळगडे येथील गट नंबर २५२ मो.र.नं. ५८१७/२०२१ या मूळ प्रकरणाची संपूर्ण केस नक्कल मिळण्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयाकडे तब्बल तीन वेळा अर्ज केला होता. त्यांना ती नक्कल मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी भूमि अभिलेख विभागाच्या तालुका उपअधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांना तात्काळ नकला देण्याचा आदेश दिला.
त्याचा राग आल्याने पुढचे रामायण घडले. कुलकर्णी यांनी नशापाणी केले आहे किंवा कसे खातरजमा करण्यासाठी तक्रारदाराने पोलिसांना पाचारण केल्यानंतर कुलकर्णी यांनी तेथून पोबारा केला. दरम्यान, या संदर्भात भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सुशील पवार यांना विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. कारवाईची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

