पुणे
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कासुर्डी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कार्यालयाकडुन होणार्या मानसिक त्रासाला आणि त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन महिला सरपंच सारिका शांताराम मालुसरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
यामुळे भोर तालुक्यातील राजकिय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्याणच्या काळात कासुर्डी गावात केलेल्या विकासकामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सारिका मालुसरे यांचे कौतुक केले होते.
सरपंच म्हणुन कारभार करत असताना प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक विकासकामांमध्ये अडचणी व अडथळे निर्माण केले जातात,झालेल्या कामाचे बिल अदा न करणे,कोणतेही कागदपत्रांची पोच न देणे,वारंवार अपमानास्पद वागणुक देणे आदी प्रकार वारंवार घडत गेले याबाबत वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही : सारिका मालुसरे,सरपंच,कासुर्डी
सारिका मालुसरे ह्या सन २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतुन सरपंच म्हणुन निवडुन आलेल्या आहेत कासुर्डी येथील ग्रामपंचायतीचे संबंधीत ग्रामसेवक आणि भोर पंचायत समिती कार्यालयाकडुन होणार्या मानसिक त्रासाला कंटाळुन गटविकास अधिकारी व प्रभारी सभापती यांच्या नावे भोर पंचायत समिती कार्यालयात राजिनाम्याचे पत्र दिले आहे.
संबंधीत ग्रामसेवक यांच्या पाठीशी पक्षातीलच काही मंडळी असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील अंतर्गत बंडाळीचा फटका महिला सरपंच मालुसरे यांना सोसावा लागत असल्याची चर्चा सुरु आहे.